Monday, March 11, 2013

अग आई आणि अहो आई. - एक गमतीदार किस्सा...


                           अग आई आणि अहो आई.
-                                                                                                                           -   एक गमतीदार किस्सा...

लग्ना नंतर 'अहो आई' म्हणायची मला स्वत:ला सवयच लावून घायला लागली असं म्हणायला हरकत नाही. 'अहो आई', 'तुम्ही' वगैरे माला बोलायला तसं अजूनही जडच जातं. आई अशी हाक मारताना 'ए आई sss', 'ए आई ग sss', 'अग आई ग sss' असच हक्काने तोंडी येतं. हक्क! खरच आपल्या आईवर आपला केवढा हक्क असतो. घरात सगळ्यांनीच  ‌‌‌गृहीत धरलेली व्यक्ती म्हणजे आई. 

माझी 'अग आई' नोकरी करत असल्या मुळे मला आणि ताईला कामाची अगदीच सवय नव्हती असं नाही. आयत ताट हातात मिळत नसलं, तरी सगळा स्वयंपाक करायला, अथवा घरचं काही संपलं आहे/नाही हे  कधी बघायला लागलं नाही हे नक्की. लग्ना नंतर एकदम सगळ अंगावर पडल्यावर मात्र माझी सुरवातीला तारांबळ उडायची. राहुलला मात्र एकटं रहायची सवय असल्यामुळे, रात्री कामावरून येताना दूध आणणे इत्यादी गोष्टी त्याच्याच लक्षात असायच्या. मला मात्र फोडणी करताना आयत्या वेळी लक्षात यायचं की घरी मोहरी संतली आहे. अर्थात राहुलने कधीच त्या वरून माला टोमणे मारले नाहीत. मी आणि राहुल असे दोघेच राहत असल्या मुळे आम्हाला काहीही backup नव्हता. पण कदाचीत त्यामुळेच चुका झाल्या तरी फार काही वाटायचं देखील नाही. कारण जेवणारे आम्ही दोघचं. उकडलेल्या बटाट्याची भाजी, काचऱ्याच्या भाजी सारखी तीखट घालून पण मी बनवली आहे. कारण त्या दिवशी घरी मोहरी होती, पण मिरच्याच संपल्या होत्या. असेच चुकत चुकत मी शिकत होते. ह्या सगळ्यात भर म्हणून की काय, घरी अजून कामवाली बाई मिळाली नव्हती. त्यामुळे, स्वयंपाक करणे, काय संपलं आहे/नाही हे बघणे, भांडी घासणे, केर-लादी हे सगळं आम्ही दोघं मिळून करत असू.

तर असं सगळं सुरळीत? चालू असतानाचं लग्ना नंतर साधारण २ महिन्यानी आमच्या अहो आई, म्हणजेच माझा सासूबाई आणि सासरे आमच्याकडे रहावयास आले. तो पर्यंत कामाची तशी सवय लागायला लागली होती. तरी कधीतरी गडबड ती व्हायचीच. त्यात सासूबाई पहिल्यांदाच रहावयास आल्या कारणाने त्यांच्यावर impression मारणं आलंच J J. मी जिद्दीने आणि प्रेमाने सगळं केलं देखील. आणि ते सुद्धा न चुकता. त्यांना काही म्हणजे काही करायला अथवा बघायला लागलं नाही हे विशेष. मला स्वत:लाच समाधान वाटलं. त्यांना पण आराम वाटला.

त्या नंतर काही दिवसानी माझी अग आई, नाना, ताई, जिजू आणि अहना असे सगळे अमच्याकडे आले. मी अहनाच्या आवडीचा बटाट्यांच्या परोठ्यांचा बेत आखला होता. इतर सगळ आई, नाना येईपरीयंत मी तयार करून ठेवलं होतं. परोठे तेवढे करायचे बाकी होते. आई लगेच म्हणाली, "तू सगळं केलं आहेस, आता परोठे मी करते". मी लगेच म्हणाले, "बर चालेल". असचं राहुलची आई, म्हणजेच माझ्या आहो आई पण म्हणायच्या. तेव्हा मी त्यांना म्हणायचे, "नाही, नको! मी करीन. तुम्ही आराम करा... वगैरे वगैरे".

हे माझ्याकडून इतक्या सहजतेने घडलं की मी असा फरक केलेला माझा लक्षात देखील आला नाही. राहुलने माला जेव्हा सांगीतलं तेव्हा माझा हे लक्षात आलं. तो म्हणाला, "कसली हरामखोर आहेस! सासू ला म्हणते मी करते, मी करते. आणि आईला कामला लावतेस". खंरच! आता तसं बघता आई आणि माझ्या सासूबाई एकाच वयाच्या. पण मी आईला गृहीत धरले. किती सहजतेने अथवा अनवधानाने असा फरक आपल्या हातून घडून जातो ह्याची मला गंमत वाटते. हे मी माझा अग आईला सांगीतल्यावर ती म्हणाली, “असच असतं! तुझ्या सासूबाई कधीतरीच तुमच्या कडे येणार, तेव्हा तू त्यांना काम करायला का सांगणार आहेस”. माला पटलं. पण मग माझी आई देखील कधीतरीच तर येते माझ्या कडे?

मला हसू आले आणि गंमत देखील वाटली. कदाचित आईला असं गृहीत धरलेलंच आवडत असेल. अथवा मी मुलगी म्हणून आईला असं ग्रुहीत धरण्याचा माझा हक्कचं आहे!