Sunday, February 13, 2011

जपानी भाषेतील 'Politeness' ’आदरातिथ्य’ चा उच्चांक

जपानी भाषा शिकायला लागल्यापासून त्या भाषेची कांहीं ठराविक वैशिष्ठ्ये मला समजायला लागली. जपानी भाषा शिकायला जाण्याआधी मी त्या भाषेची कांहींशी माहिती काढायला सुरवात केली. आशियाई देशात खूपदा भारतीय संस्कृतीची कुठल्या ना कुठल्या स्वरुपात छाप दिसते कां ते मी नेहमी शोधत असते. राजा अशोकाच्या मुलीने जपानच्या राजाशी लग्न करून आपली खूप संस्कॄती जपानला नेली आहे. जपानवर भारत आणि चीन ह्यांचा खूप प्रभाव असल्याचे जाणवते. भारतातील 'पोंगल', 'चैत्रगौर', 'पित्रूपंधरवडा', 'विविध मंदिरांच्या निघणाऱ्या पालख्या', 'शस्त्रपूजा' इत्यादि सारखे कांहीं सण जपानमध्ये साजरे केले जातात. तर चीनकडून त्यांनी लेखी भाषा उचलली. एवढेच नव्हे तर 'चहा' 「お茶」हे पेय त्यांनी चीन्यांकडून उचलले व जपानच्या नम्र पद्धतीत ते बसवून 'Tea ceremony' नांवाचा एक प्रकार अमलात आणला.

जपानी भाषा ऎकायला गेलं तर शिव्यांचा भडिमारच वाटतो. साधं 'तारखा' बघायच्या झाल्या तर 'त्सुईताची', 'फ़ुत्सुका', 'मिक्का', 'योक्का' 'ईत्सुक्का', 'मुईका', 'नानोका', 'योsका', 'कोकोनोका' आणि 'तोsका', अशा प्रकारे १ ते १० तारखांची नांवे. नळावरच्या दोन बायका भांडताना जे ध्वनिमुद्रण ऎकायला येते तसच काहीतरी. मी ही भाषा शिकायला लागल्याचा एक प्रसंग - नुकत्याच मी ह्या तारखा पाठ केल्या होत्या. क्लास सुटून मी आणि माझी मैत्रीण 'लेडिज स्पेशल' पकडून परतीच्या प्रवासाला लागलो. 'लेडिज स्पेशल' ट्रेन म्हणजे एक प्रकारे विविध रेडियो स्टेशने एकाच वेळी एकाच डब्यात लावली तर कसे वाटेल, तसलाच प्रकार असतो. कॉलेजच्या मुलींचा हषा, office
मधल्या बायकांच्या गप्पा आणि सण साजरे करणे, गुजराती बायकांचे डब्याच्या एका फ़र्लांगपासून ते दुसऱ्या फ़र्लांगापर्यंतचे बोलणे आणि चरणे, कानातल्या पासून dress material ते भाज्या विकणाऱ्या बयका ह्या सगळ्यांच्या रोजच्या गोंधळात डोक्याचा भुगा झाला होता. त्यात last stop ला उतरायचे असूनही दरवाजात उभ्या असलेल्या बाईशी एकीच कड्याक्याचे भांडण झाले. बाचा - बाची मधे अनेक 'ब' 'भ' शिव्यांनी उद्धार झाला. 'मराठी - हिंदी' ह्या दोन्ही संमृद्ध भाषांचा पण उद्दार झाला. 'तुमको thane उतरना है तो तुम कायको अभिसे इधर दरवाजेमे खडी है? अंदर जाके निवांत बेठोनं'. दरावरची बाई: 'अंदर कैसे जाऊ? सबको तुडाके जाऊं क्या? मैं घाटकोपरमे उतरके वापस चढताय ना. तुम कायकू tension लेती हो' अशा प्रकारे दोन मराठी बायका हिंदित भांडायला लागल्या. शेवटी असहाय होऊन मी, 'ब' 'भ' शिव्याच्या सुरात, 'त्सुईताची', 'फ़ुत्सुका', 'मिक्का' चालू केले. चेहऱ्यावर एक प्रकारचा त्रासीक भाव व 'ब' 'भ' शिव्यांमधे PhD. केलेल्यांना सुद्दा झिंग येईल असे उच्चार. आज आपल्या डब्यात एक 'भारी' व्यक्ती आली आहे असा आदर मला मिळाला. मी पण उगाचच जरा भाव खाऊन घेतला. एरवी मामला बिकट असतो.


जपानी भाषा ऎकायला एवढी भयानक वाटते तेव्हढीच ती भाषा अत्यंत नम्र भाषा म्हणून ओळखली जाते ह्यावर माझा सुरवातीला विश्वासच बसेना. पण हे खरे आहे. जपानी माणूस ज्या पद्दतीने अनेकदा 'अभिवादनास्पद' आपल्या समोर वाकतो त्यावरून त्यांच्या नंम्रतेचा अंदाज लावता येईल. आपली मराठी म्हण, 'मोडेन पण वाकणार नाही' ह्याचे जपानी भाषेत भाषांतर होणे कठीणच. ते लोक बोलताना सुद्दा बसल्या बसल्या थोडीसे
वाकतच असतात. वाकण्याचे पण बरेच प्रकार. साध डोक थोडसे वाकवले कीं ते informal अभिवादन, मित्राला करण्याजोगे. चालता चालता थोडेसे वाकले कीं अपण रस्यात भेटल्यावर जशी नजरानजर करतो तसला प्रकार. पूर्ण कमरेतून ९० अंश वाकणे म्हणजे खरा आदरपूर्वक नमस्कार. (नशीब भारताचा साष्टांग नमस्कार त्यांनी आत्मसात केला नाही). तातामी (चटई) वर तुम्ही बसला असाल तर वज्रासनात बसून मग कमरेत थोडेसे वाकणे आलच. थोडक्यात काय, कसेही वाका पण वाका. अमेरिकन (पाश्चिमात्य) संस्कृती कपडे, लग्न समारंभ आणि लग्न व्यवस्था, leave-in-relationship
घेण्यापुरतीच. पाश्चात्य देशाचा तुसडेपणा आणि friendliness त्यांना रुचला नाही आणि पचलाही नाही. कामावर boss आणि subordinate नी एकाच टेबलावर जेवणे त्यांना नामंजूरच. 'Hierarchy' हा प्रकार जेवढा जपान मधे पाळला जातो, तेवढा इतरत्र कुठेही पाळला जात नाही. Boss शी बोलताना, थोडेसे वाकून, त्याच्या उंचीपेक्षा खाली जाऊन, नजरेला नजर न भिडवता ते बोलतात.

भाषा हा एक अजून वेगळा प्रकार. 'Polite form' चे पण बरेच प्रकार. तुम्ही कुणाशी बोलत आहात, तुमच आणि त्या माणसाच पद, ह्या गोष्टीवरून क्रियापदात बदल करावा लागतो.
उदा. ジョンさんがさとさんを待つ。
जोन हा सातो साठी थांबला आहे. (John waits for Sato) असा साधा सरळ अर्थ.

पण हेच Teacher कुणा विद्यार्थ्यासाठी थांबली असेल तर -
   先生がお待ちになる。
   Teacher थांबली आहे. (Teacher wait) पण ह्यात teacher नी आपल्यावर उपकार केल्याचा स्वर असतो.

विद्यार्थी teacher साठी थांबला असेल तर -
先生をお待ちする。
   विद्यार्थी teacher साठी थांबला आहे. (I await for you, teacher) ह्यात कर्ता अपण असलो तरी teacher चा हुद्दा अपल्यापेक्षा मोठा आहे म्हणून आपण त्यांच्या साठी थांबलो, ह्यात आपलच भाग्य
असल्याचा भाव.

एवढ्यानेच हे संपत नाही... कामावर कांहीं कारणास्तव तुम्हाला घरी लवकर जायच आहे असा साधा सरळ / सोपा प्रसंग. तुम्हाला तुमच्या boss ची ह्यासाठी परवानगी घ्यायची आहे.
English मधे, "Would it be fine for me to leave early today", किंवा "Can I leave early today, please". अस म्हटल तरी ते चालत व ते polite समजल जात. पण जपानी भाषेत मात्र, 「ちょっと早く行かせていただけませんか」。अर्थात, "May I get you to let me go early" एवढ्या पातळीवर polite भाषा वापरली जाते.

「お元気ですか」。ओगेनकी देसुका? (O-genki desuka?) ज्या शब्दाला मान द्यायचा, त्याच्या मागे 'O/ओ' 'Go / गो' लागतो. वरील उदा. गेनकी म्हणजे तब्बेत / health. 'तुमची तब्बेत कशी आहे?' हा साधा प्रश्न पण गेनकी च्या मागे 'ओ' लाऊन त्या शब्दाचा प्रभाव वाढवायचा व त्याला मान द्यायचा. ह्याच उत्तर पण पदावरून बदलते. तुमचं पद श्रेष्ट असल्यास, 「はい、元気です」。(हाय, गेनकी देसु) म्हणजे, हो! मी बरा आहे अस साध सरळ. पण विचारणाऱ्या माणसापेक्षा तुमचं पद (इथे फ़क्त नोकरीतलेच पद नव्हे तए व्यवहारीक पद पण लक्षात घेतल जात) अनुसार तुम्ही वरिष्ठ माणसाला उत्तर देतना.. 「おかげさまで元気です」。(ओकगेसमदे गेनकी देसु). ह्याचा शब्दश: भाषांतर म्हणजे, "तुमच्या कृपेने मी बरी आहे".

さん / सान - सान हा शब्द, "श्री", "श्रीमती", "सौ", "कु" इत्यादी (Mr. Mrs. Miss) सगळ्यासाठी वापरतात. पण स्वत:साठी तो वापरायचा नसतो. आपले हिंदी भाषीक स्वत:ला पण 'हम' म्हणूनच संबोधतात तसला प्रकार नाही. पण जपानी माणूस दुरऱ्या देशात गेला असेल तर तो जपानी असल्याच्या अभिमानास्तव स्वत:ला ही 'सान' लावतो.

अता कालचीच गोष्ट. माझी मैत्रीण क्रांती दुभाशी म्हणून एका call वर बसली होती. तेव्हा सुरवातीला 「お世話になっております」。(ओसेवनीनत्तेओरीमासु) अस म्हणून, "मी तुमच्या सेवेला तत्पर आहे" अस आभिवादन केले. आपल्या अस्सल मराठी भाषेत न-सजेसे. एक तर त्याला इंग्रजी येत नाही म्हणून ती त्याला मदत करत होती. तरी त्याच्या ऎवजी तिने कां बरे धंन्यता मानावी? ह्या उलट आपण असतो तर, "बोंबला! अरे एवढ साध English येत नाही तुला? चायला! मला कामाला लवलस तू" अस कांहींस बोलून सुरवात झाली असती ह्यात शंका नाही.