Monday, March 10, 2025

उन्हाळा - घंगाळ - बंब - मातीचा माठ

उन्हाळा आला की तीन गोष्टींची प्रखरतेने आठवण येते.
आंघोळीसाठी चे घंगाळ, बंब अणि मातीचा माठ. 


माझ्या लहानपणी आमच्याकडे मस्त तांब्याचे मोठे घंगाळ होते. त्या घंगाळात बसुन आंघोळ केलेली पण मला आठवते. हळू हळू सोय म्हणून किंवा वजनाला हलकं म्हणून plastic /steel च्या बदल्या आल्या. घंगाळ तसे जडच. तरी अनेक वर्ष ते आमच्या मुंबईच्या घरी न्हाणीघरात भिंतीवर लटकवलेले होते. मग एक दिवस अचानक नानांचा (माझे बाबा) मानत काय आले कुणास ठाऊक त्यांनी ते काढून टाकले. पण मला अजुनही त्या घंगाळाची आठवण येते. ईशांक चे लहानपणीचे बादलीत बसलेले फोटो पाहिले की त्या घंगाळाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. 

माझ्या आजोळी, म्हणाले प्रभादेवीला आमच्याकडे एक बंब होता. त्यात पाणी अतिशय थंड असायचे. आंघोळीचे पाणी

गरम करण्यासाठी बंबाचा वापर केला जात असे. यात इंधन म्हणुन गोवरी व लाकूड फाटा वाळलेल्या तुराट्या, ज्वारीचा कडबा आदींचा उपयोग होतो. मग flat system मध्ये आल्यावर ती सोय नव्हती, त्यात सरपण मिळेनासे झाले अणि बंब नुसता water storage म्हणून ठेवलेला असायचा. त्यातले पाणी प्रचंड थंड (chilled) असायचे. आजोळी गेले की मी मुंबईच्या उकाड्यात त्या बंबाच्या पाण्यातच बारा महिने आंघोळ करत असे. मामे बहिणीला मात्रा बारा महिने कडकडीत गरम पाणी लावायचे. काय छान होते ते दिवस. 

आता आधुनिक showers, tub bath सगळे आले तरी त्या घंगाळाची किंवा त्या बंबाची सर ह्या temperature controlled पाण्याला नाही. 


आता राहिला आहे तो फक्त मातीचा माठ. तो मात्र अजून सगळ्या घरत आपली शान राखून आहे. उन्हाळा आला की त्याला धुऊन, स्वच्छ करून, त्यात पाणी भरून, थोड ऊन लागेल अश्या ठिकाणी अजूनही खूप घरी ठेवले जाते. Fridge आले तरी माठाच्या पणाला त्याची सर नाही, असे म्हंटले जाते, म्हणून अजूनतरी खूप घरी मातीचा माठ आपली शान टिकवून आहे. 

मध्यंतरी मी ईशांक साठी शंख आणायला
तुळशीबागेतल्या राम मंदिरात गेलेले. तिथे अजूनही ह्या वस्तू मिळतात. खूप मोह झालेला एक मोठ्ठ घंगाळ घेण्याचा. पण किम्मत बघून थांबले. Showpiece म्हणून टेबलावर ठेवायचे घंगाळाची किम्मत १५००/-. मोठ्या घंगाळाची किम्मत तर ₹२०,००० पासून पुढे. लहानपणीच्या त्या आठवणीत जायला कधीतरी मस्त वाटतं.

फेब्रुवारी जसाजसा संपत आला तसा घरी माठ ठेवला परत जागा केली. मला अजुनही तो typical माठ त्या सुंदर दिसणार्‍या earthen clay पेक्षा जास्त आवडतो. मला असं वाटतं की त्या जुन्या माठातीलच पाणी जास्त थंड होतं. ह्या वर्षी मीच माझ्या old is gold माठावर काहीतरी painting करण्याचा विचार करते आहे.

© SharvaniPethe (शर्वाणी पेठे) 
March 2025

Saturday, March 08, 2025

New moon अणि Solar eclipse

आजच्या मुलांना शिकवताना technology मदतीला असते. Google बाईची साथ असते त्यामुळे लगेच visuals, diagrams, आणि example मिळतात, त्यामुळे concepts पटकन clear होतात. पूर्वी फक्त पुस्तकं असायची. प्रश्न पडला की उत्तर मिळायची ती आई-वडील, शिक्षक ह्यांच्या कडे असलेल्या अफाट ज्ञानातून. शिक्षक मग फळ्यावर चित्र काढून explain करत असत.

तसं पाहिलं तर दोन्ही पद्धतींचे फायदे आहेत—पूर्वीचा अभ्यास discipline शिकवायचा, तर आत्ताचा अभ्यास curiosity वाढवतो.

उद्या EVS ची परीक्षा. आज परत सगळं ब्रह्माण्ड आमच्या घरी आले. 
मी - What is new moon?
ईशांक - When the moon is between the Earth and the sun, and when moon's dark side faces the Earth is called new moon.
पण आई...... (आलाच प्रश्न)
Solar eclipse वेळी पण same असतं. मग त्यात फरक काय?

ह्या त्याच्या प्रश्नाला Google बाई कडून हे image मिळाले, ह्याचा मदतीने मग moon position, moon's orbit, Earth's orbit, sun position, sun rays सगळं कसं व्यवस्थित सांगता आले. 

धन्यवाद Google ताई.

ईशांक - आई आपण Earth वर रहात असून सुद्धा बाकीच्या Planets च्या Moons ला आपण नावं दिली. मग आपल्या Earth च्या moon चं नाव काय?

मी - ?????? आपल्या moon च नाव Moon - Proper noun. बाकीच्यांचे moons are common noun. 

हे पटलं असाल तरी आपल्या moon ला पण एक नाव पाहिजे ह्यावर तो ठाम आहे.

अरे अभ्यास अभ्यास....

Math, English, Marathi, Hindi, GK, Computer ह्या सगळ्याचा अभ्यास घेण आता मला सोपं वाटतं. कारण त्यात प्रश्न विचारायला फार scope नसतो. 
पण EVS चा अभ्यास आणि असंख्य प्रश्न.....
त्यात आज आम्ही evs मधला आवडता topic घेतला Our solar system. अभ्यासक्रमात फक्त आम्हाला Sun, starts, planets, moon आहेत. पण universe वरचे अनेक videos बघून अणि संपदा काकू कडून त्यावर मिळालेली पुस्तके वाचून, अभ्यास सोडून Europa, Sirius ह्यावरच गप्पा जास्त होतात. आई काकू नी दिलेल्या पुस्तकात मी वाचलं आहे, Earth आधी सरळ होती, म्हणजे तिचे axis straight होते. मग एक मोठ्ठ colision झालं आणि त्यांनी अख्खी Earth tilted झाली एका side ला. केवढा मोठ्ठा force असेल ना तो, अख्खी Earth च tilt केली.

मी मात्र येन- केन-प्रकारेण त्याला परत अभ्यासात आणत असते. १- २ पुस्तकातले प्रश्न झाले की परत गाडी रुळावरून घसरतेच.

Solar system मध्ये पण आता Space अणि atmosphere हा सध्याचा आमचा एक आवडता विषय. Planets चे प्रश्न 1st आणि 2nd ला असतानाच झाले. ते संपले नसले तरी बर्‍यापैकी कमी झाले आहेत.

प्रश्न १ 
ईशांक - आई प्रत्येक planet च atmosphere एकमेकांबरोबर jointed असतं का? म्हणजे Earth च atmosphere संपलं की लगेच venus चे अणि Jupitar चे atmosphere लागत का?
मी - नाही! आपलं atmosphere आपल्या बरोबर ठराविक अंतरापर्यंत असतं. तसेच प्रत्येक planet च असतं. दोन planets च्या atmosphere मध्ये खूप distance / gap असते त्यालाच space म्हणतात. 
आणि मुळात प्रतेक Planet ची revolution speed वेगवेगळी आहे, ते एका line मध्ये आले तर atmosphere joint होईल ना. पण तसाही gap खूप आहे, so venus अणि earth एका line मध्ये आले तरी ते शक्य नाही.
ईशांक - हा! Venus ला १ वर्षा पेक्षा कमी वेळ लागतो sun भोवती revolution करायला. 
मी - आणि Jupiter ला Earth चे १२ वर्ष.
ईशांक - हा! कुंभ मेळा. तू सांगितलस मला.

प्रश्न २
ईशांक - Space मध्ये काळोख का असतो हे माहिती आहे मला, पण space थंड असते की गरम? कारण light दिसत नसला तरी असतो ना, मग जर का sun light आहे तर मग space गरम असेल ना?
मी - Space थंड आहे. पण त्याचे कारण खूप complicated आहे. ते तुला आत्ता नाही समजणार, radiation, light, temperature हे सगळे मोठा झालास की समजेल. 
ईशांक - अच्छा! म्हणजे 4th standard ला गेलो की 
मी - 🙄🙄🙄🙄🙄

प्रश्न ३
ईशांक - आई sun वर जाता येत नाही ते ठीक पण sun ची space जर का थंड आहे, मग तिथे का येत नाही जाता?
मी - मला आत्ता तरी ह्याचे उत्तर माहिती नाही. (खरच माहिती नाही. आणि आता ह्याची परीक्षा झाली की ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम आले माझ्या मागे. कुणाला कारण माहिती असेल तर नक्की share करा. Or link ज्यात सोप्या भाषेत explain केले असेल).

बरं ह्याला सांगितलं की टीचरांना विचारत जा. तर उत्तर ठरलेलं, त्यांना वेळ नसतो. मुलांसाठी आई रिकामटेकडीच असते.

ह्या नंतर मग नेहमी प्रमाणे अफाट कल्पना रंगल्या. आई imagine कर की earth revolution करते आहे पण त्याचे atmosphere तिथेच थांबल तर? ते आपल्या gravity मुळे आपल्या बरोबर फिरलच नाही तर काय होईल?
मी - विमान take off करेल आणि Earth sun भोवती प्रदक्षिणा मारून परत तिथे आली की ते विमान landing करेल अजून काय.  
दोघांच्या imagination वर खूप हसून आम्ही परत अभ्यासाकडे वळलो (कदाचित).

अरे अभ्यास अभ्यास, आई चा संयम चुल्ह्यावर |
आधी इतरत्र प्रश्न, तेव्हा होई आमचा अभ्यास |

काय करावे ह्या मुलाचे... Pink Tax

मध्यंतरी एक छान video बघितला 'Pink tax' (the practice of charging women more for products and services than men for similar items.) ईशांकला तो video दाखवला, की बघ कसं असतं marketing, छोटा भीम चा towel ₹ 250 तोच दुसर्‍या unfamous cartoon चा पंचा ₹150. ..... .... त्या नंतर

रविवारी रात्री मी चेहर्‍याला face-pack लावला. ईशांक नी विचारले, "तू उटणे का लावतेस चेहर्‍याला?" म्हंटल अरे हे उटणे नाही face pack आहे. तर आगाऊ लगेच म्हणाला, "हं! हा pink tax आहे. सगळे ingredients तर तेच आहेत, face-pack म्हंटलं की किम्मत double". 
काय करावे ह्या मुलाचे... February 2025.

जुने ते सोने – पारंपरिक भांड्यांकडे परत एक पाऊल

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सोय आणि वेग याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच स्वयंपाकघरात non-stick आणि aluminium भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण काही गोष्टी सोयीसाठी घेतल्या तरी त्याचे दुष्परिणाम लक्षात घ्यायला हवेत. मला हे जाणवलं आणि शेवटी मी ठरवलं – पारंपरिक भांड्यांकडे परत वळायचं!
मी नुकताच माझ्या स्वयंपाकघरातील non-stick तवे, aluminium कढया माळ्यावर टाकून दिल्या आणि त्याऐवजी लोखंडाच्या भांड्यांचा वापर सुरू केला. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण जसजसा वापर वाढला, तसतसे त्याचे फायदेही समजू लागले.

परंपरागत काही सवयी आपण आत्मसात करतो, त्यातली मी एक आत्मसात केलेली गोष्ट म्हणजे आमटीला फोडणी केली की ती पळी आमटी मध्ये ठेऊन थोडावेळ आमटीला उकळी येऊन देणे. पोटात natural form मधले लोखंड जावं हा त्या मागचा उद्देश. पण मग शिरा, उपमा, पुर्या करायला aluminium कढई किवा non-stick, भाजी साठी non-stick कढई / pressure pan, पोळ्या भाजण्यासाठी परत non-stick तवा असे चालू होते. भाकरी मात्र लोखंडाच्या ताव्यावर. खूप दिवस मानला हे खटकत होतेच, शेवटी मी अणि ताई दोघांनी जाऊन लोखंडाच्या सामानाची खरेदी केली.

लोखंडी भांडी वापरायला लागण्या आधीची तयारी - 
लोखंडी भांडी बाजारातून आणली अणि एकदा धुऊन वापरायला घेतली असे करून चालत नाही. एकदा धुऊन, पुसून, त्याला सगळीकडून आधी तेल लाऊन (गोड किंवा खोबरेल) ती अर्थ तास तशीच ठेवायची. मग एका स्वच्छ फडक्याने ती पुसून घेऊन मग परत स्वच्छ धुवून मग ती वापरण्यासाठी तयार होतात. असे न केल्यास पदार्थ काळे पडतात. मी ही भांडी वापरायला सुरवात केल्यावर १-२ दिवस जरा त्रास झाला. रात्रीचा स्वयंपाक अणि मुलाचा अभ्यास असा एकत्र चालतो, अणि ‘नजर हटी दुर्घटना घटी’ म्हणतात तसेच जरा मुलाच्या अभ्यासात डोके घातले अणि भाजी जाऊन खाली चिकटली. ‘पीठ पेरून केलेल्या भाज्या जरा खरपूसच चांगल्या लागतात’ म्हणत मी दोघांना काही बोलूच दिले नाही. पण त्या चिकटलेल्या भाजीला लोखंडी कढई काही सोडवेना. मग शेवटी तिला भिजत घालून, मग उकळी काढून तिला साफ केले.

अजून एक कटकटीचे काम म्हणजे लोखंडाच्या वस्तू लगेच धुऊन, पुसून ठेवायला लागतात. त्याला एक पर्याय मी काढला आहे. मी ती भांडी साबणाच्या पाण्यात भिजत घालून ठेवते. आमच्या मावशी त्या धुतात अणि लगेच पुसून मग उपड्या घालतात. अशी लगेच पुसून ठेवायला तयार असलेली मावशी मिळाली तर non-stick ला replace करून लोखंडी भांडी वापरायला हरकत नाही.

पुढचा टप्पा – पितळी भांडी
लोखंडी भांडी वापरायला सुरुवात केली तशीच हळूहळू पितळी भांडी घेण्याचीही इच्छा आहे. तांब्याचा पिंप आणि चांदीचा पेला घरी आहेच, पण स्टीलच्या ताट-वाट्यांच्या जागी पितळ घ्यावे असं वाटतंय.
त्या नंतर घरातील plastic storage containers बदलून त्या जागी पितळी डब्बे घेण्याचा पण विचार आहे. ह्या साठी वेळ लागेल. पण पितळी भांड्यांचं आकर्षण काही वेगळंच – looks आणि utility दोन्ही!

“Non-stick ” पासून “sustainable” कडे प्रवास -
Non-stickचा पर्याय तात्पुरती सोय देतो, पण आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी टिकाऊ पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. लोखंड, तांबे, पितळ यासारखी पारंपरिक भांडी वापरणे म्हणजे केवळ जुन्या पद्धतीकडे परत जाणे नाही, तर ते एक sustainable आणि आरोग्यदायी पाऊल आहे.

तुम्हीही हा बदल करू शकता! जर तुम्हीही non-stick आणि aluminium पासून मुक्त होण्याचा विचार करत असाल, तर सुरुवात लोखंडी कढईपासून करा. थोडा वेळ लागेल, थोडं चिकटेल, पण हळूहळू सवय लागेल आणि तुम्हाला याचा खूप फायदा जाणवेल.

बाजारात तेच विकते जे खपते. पितळ अणि तांब्याचा वापर वाढला तर कल्हई वाले पण कोपर्‍या कोपर्‍यात दिसतीलच.

“जुने ते सोने” ही फक्त म्हण नाही, तर ती आरोग्यासाठीची उत्तम निवड आहे!
---‐--------------------०--------------०-------------------------
Photo from google.

Wednesday, July 10, 2024

यंदा कर्तव्य आहे (Matrimony चे बदललेले रूप)

सध्या आपल्या Monday Matrimony (पुण्याला एक Ladies group आहे, त्यात दर दिवशी वगळा विषय घेऊन/निवडून post असते) त्याचे posts बघितले की इतकं भारी वाटतं. खूप वेळा मुली स्वतः स्वतःसाठी post करतात. ते बघून तर खुपचं मस्त वाटतं. हा group महिलांसाठी असल्यामुळे मग भावासाठी, मित्रासाठी, दिरासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन post करतं. सध्याच्या मुला मुलींचे photo बघितले की मन माझ्या लग्नाच्या काळी जातं.

माझ्या लग्नाला आता १२ वर्ष झाली. माझ्या ज्या मैत्रिणींनी लवकर लग्न केली त्यांच्या लग्नाला तर आता १७-१८ वर्ष झाली. ज्या मैत्रिणीचं लग्न सगळ्यात आधी ठरलं तेव्हा ती २३ वर्षांची होती अणि तेव्हाचा तिचा वधू-वर सूचक मंडळ साठी काढलेला ‘तो’ साडीतला photo अजून आठवतो. तेव्हा त्या साठी मुद्धाम photo studio मधे जाऊन photo काढण्याची पद्धय होती. मुलगा असो वा मुलगी दोन photo mandatory असायचे की काय असं वाटतं. एक close-up photo आणि एक full. मुलगी असेल तर हात खाली cross केलेले, थोडी तिरकी उभी राहून काढलेला एक full size photo (साडीची प्रत्येक निरी दिसलीच पाहिजे असा जणू नियमच होता). मुलगा असेल तर suit, tie मधला formal photo असायचा किंवा T-shirt मधला photo. मग कधी bike वर बसलेला, कधी एक पाय stool वर ठेऊन style मारत blazer चे cuff button लावताना चा photo असायचा. नंतर मग हळू हळू मुलींचे पंजाबी ड्रेस मधले photo येऊ लागले. मुलं पण जर jeans आणि shirt / T-shirt घालून photo काढू लागले. मुलगा / मुलगी भारता बाहेर असतील तर तिथला photo असायचा. मग त्या देशातली नदी, Eiffel tower, Burj Khalifa, Niagara falls ईत्यादी ला background मधे ठेवून photo असायचा. पण photo ची पद्धत तीच. अत्ता ३५ ते ४५ वर्ष वयाच्या खूप जणी मस्त long gowns, frock, long / short skirt घालायला लागल्या आहेत. लग्ना आधी पण ह्यातल्या खूप जणी (मी सुद्धा) Jeans – T-shirts, long skirt, क्वचित knee length short skirt घालतच होते की. पण लग्ना साठीचा ‘तो’ photo मात्र साडी किंवा पंजाबी ड्रेस मधेच असायचा.

काळ जसजसा पुढे जाऊ लागला तसा ह्यात खूप फरक पडायला लागला. जास्त करून मुलींच्या photo मधे. तसंही fashion म्हटलं की मुलांचा काय संबंध येतो. त्यातल्या त्यात cargo half pant वरचे photo टाकतात. तेवढीच काय ती fashion. मुलींच्या photo मधे कमालीचा फरक जाणवतो. साडी / Punjabi dress पासून ते jeans / shorts / blazer / skirt सगळ्यातले photos असतात. मस्त वाटतं बघून. अर्थात confidence अणि संस्कार dress वरून ठरत नसतोच म्हणा. जे carry करता येतं त्यांनी confidence वाढतोच. अणि half pant घालून पण मोठ्यांचा आदर करता येतोच. मग ती साडी असू दे किंवा shorts, carry करता आली पाहिजे. टोमणे मारणारे पण खूप असतातच. काय बाई आजकालच्या मुली. पण त्यांना हे समजत नाही की त्या जे कपडे घालतात ते पण त्यांचा एक दोन पिढ्या आधी चालत नव्हते. 

ह्यावरून एक किस्सा आठवला. चांगल्या marks नी pass झालो म्हणून मला आणि माझ्या मामे बहिणीला आजोबांनी पैसे दिले. आम्ही त्यातून मस्त jeans घेतली आणि आनंदानी जाऊन आजोबांना दाखवली. आजोबा रागवले नाहीत पण म्हणाले, “काशीला मी शिकत असताना कुणी मला सांगितले असते की तुझ्या नाती हे असले कपडे घालणार आहेत तर मी त्याच्या सकट गंगेत उडी मारली असती”. अर्थात ते हे हसत बोलले असले तरी त्याच्या अर्थ आम्हाला समजला. मग मामी ने त्यांच्या वतीने ओरडायच काम केलं. “अजिबांनी दिलेल्या पैशातून तुम्ही jeans कशी घेतलीत? अत्ता जाऊन बदलून या”. ते दुकान बांद्रा ला होतं आणि परत जण शक्य नव्हतं म्हणून मग मामीनी आम्हाला अजून पैसे दिले आणि म्हणाली ह्यातून छानसा पंजाबी ड्रेस घेऊन या आणि आजोबांब दाखवा. ती jeans राहुद्या तशीच, Bday ची म्हणून ठेवा. Bday ला आता वेगळं काही मिळणार नाही. आम्ही परत जाऊन ड्रेस घेऊन आलो. आजोबांच्या चेहराच खूप काही बोलून गेला.


Arrange marriage ची process तशी खूप छान असते असं नाही. तरी enjoy करता आलं तर त्यातही खूप गमती जमती घडतात. त्या enjoy करा. मी एकदा एका मुलाकडे गेले होते. ते सुद्धा मैत्रिणी ला बरोबर घेऊन. मुलगा दोन दिवसासाठी पुण्यात होता आणि माझ्या आई बाबांना मुंबई वरून येणं काही कारणास्तव शक्य नव्हतं. मैत्रीण मुद्दाम मोठ्ठ मंगळसूत्र घालून अली. त्या मुळे आमच्यातली लग्नासाठी ची यंदा कर्तव्य आहे वाली मुलगी कोण हे लगेच लक्षात आलं. आम्ही गेलो तर दोन समवयस्क मुलं बसली होती. एक शांत आणि दुसरा बदबड्या. त्या बदबड्या मुलाशी आणि काकूंशी खूप गप्प झाल्या. शेवटी न राहून मी विचारलं, की ह्यातला xyz मुलगा कोण? काकू छान होत्या. हसत म्हणाल्या की अरे हो, मी ओळख करूनच नाही दिली. हा xyz. As predicted तो शांत असलेला मुलगा निघाला. लहान भावंडच बडबडी असतात. त्यात त्याचं घर सगळं classical संगीत मधील आणि गाण्याशी माझा दूर दूर वर संबंध नाही. ५ तांबोरे, ३-४ वीणा, खूप तबले. हे बघूनच माझ्या घश्याला कोरड पडली. काकूंनी मला विचारलं, तू गातेस का? मी म्हंटल, हो ! पण मला एकच सूर येतो, बेसूर. अर्थात काकू खूप छान होत्या. मी पुण्यात एकटी असते म्हणून त्यांनी मला खूप खाऊ घातलं. पुणेकर असून बरका. तर अश्या गमती जमती enjoy करा. मस्त जगा.

Saturday, May 25, 2024

आयुर्वेदीक काढे अणि ईशांक

अच्युतानंद गोविद, नामोच्चारण भेषजात। 
सर्व रोग विनाश होती (नश्यान्ति सकल रोगा: ) सत्यं सत्यं वदाम्हयय।।

आजकाल मी आजारी पडले की वरील मंत्र म्हणून जेव्हा ईशांक मला त्यांनी बनवलेला काढा देतो, तेव्हाच खरे तर सगळा त्रास / आजार पळून जातो. मी लहान असल्यापासून आम्ही आयुर्वेदीक औषधच घेत आलो आहोत. ईशांकसाठी सुद्धा मी घरी काढे बनवते. उन्हाळ्यात कांद्याचा काढा, थंडीत सर्दी खोकल्या साठी तुळस, पुदिना असे अनेक पदार्थ उकळून घरी काढा होतोच. ईशांकला त्यामुळे असे बरेच काढे माहिती झाले आहेत. त्यात आजीच्या पोटलीतले बरेच औषधं अणि घरगुती उपाय त्याला माहिती आहेत. आयुर्वेदिक औषधांमधे अडुळसा, लोहासव पासून ते भुंगराजासव, महासुदर्शन काढा सगळे माहिती आहेत त्याला. 

काही दिवसांपूर्वी Election साठी मुंबई ला घाईघाईत जाऊन आले अणि जरा पोट बिघडले. मुंबईचा उकाडा, त्यात AC hotel मधे बसुन मैत्रिणी बरोबरची जंगी party अणि थंड गार juice, starters, burger, चिक्कू milkshake, हे सगळे पुण्याला आल्यावर बाधले. प्रचंड उलट्यांमुळे खूप अशक्तपणा आला. मग काय ईशांक नी लगेच without fire काढा तयार केला अणि त्या बरोबर prescription. तिसरीच्या मानाने बराच चांगला प्रयत्न केला त्यांनी लिहिण्याचा. (नंतर त्याला पूर्ण मराठीत अणि पूर्ण English मधे बोलायला लावलेच मी. काय करणार, आई ती आईच).

आयुर्वेद अणि आमचे नाते खूप जुने. आजही आम्ही मुलुंडला गेलो की आमच्या आयुर्वेदिक डॉक्टर, डॉक्टर विवेक सातपूरकर ह्यांना भेटायला जातो. त्यांच्याकडून एकदा तपासले की mentally च इतकं बरं वाटतं. ह्यावेळी सुद्धा voting करून आधी डॉक्टरांना भेटायला गेले, त्याची availability माझ्या आई ने पुण्याला असतानाच केलेली, कारण election चा दिवस. नेहमी प्रमाणे डॉक्टरांना भेटून खूप गप्पा झाल्या. 

ईशांकला पण मी allopathy औषध देत नाही. का कुणास ठाऊक आजकाल सगळे डॉक्टर पटकन antibiotic चालू करतात अणि त्या मुळे मुलं पार गळून जातात. अगदी BAMS झालेले डॉक्टर पण औषध लिहून देतात. आमचे डॉक्टर जसे पुड्या बांधुन औषध देत, तसे आता फार कमी आयुर्वेदिक डॉक्टर उरले आहेत. त्यामुळे पुण्याला येऊन आता मला १५ वर्ष झाली, तरी पण अजूनही मला इथे family doctor नाहीत.

आयुर्वेदिक औषधाचा गुण यायला वेळ लागतो. तेवढा patience आजकालच्या आई  - वडिलांकडे नाही हे पण एक कारण असेल. धावपळीच्या आयुष्यात कुणाला वेळ आहे. Fast life मधे मुलं पण fast बारी झाली पाहिजेत. पण allopathy चे side effects असतातच अणि ते slowly आपले long lasting effect दाखवतात, असे मला वाटते. असो….

आज ईशांकनी बनवलेला काढा घेऊन मी हा blog लिहिण्यासाठी बसले आहे, एवढी नक्कीच energy त्याच्या काढ्यानी किंवा त्याच्या प्रेमानी मला दिली.

Wednesday, May 22, 2024

७ आकडा अणि मी.


(राहुलची अणि माझ्या सर्व नातेवाईक / मित्रपरिवार जे ७ तारखेला जन्मले आहेत त्या सगळ्यांची माफी मागून लिहिण्याचे धाडस करते आहे).

जगभरात ७ ह्या आकड्याला फार महत्त्वा आहे. त्या मागे खूप कारणं पण दिली जातात, जसे की आठवण्याचे ७ दिवस, ७ समुद्र, ७ रंगाचा इंद्रधनुष्य. हिंदू धर्मा प्रमाणे तर स्वर्गात जाण्यासाठीच्या ७ पायर्‍या, लग्नाच्या वेळी घेतले जाणारे ७ फेरे, मानवी शरीरात असलेली ७ चक्र. असे म्हनतात की जगभरात ७ आकडा आवडणारे देखील जास्त आहेत.

असेनाका! मी आहेच जगावेगळी. माझं अणि ७ आकड्याचे जरा वाकडेच आहे. लग्नासाठी मुलं बघताना, मी एका मुलाला फक्त त्याच्या जन्म तारखे वरुन भेटण्यास चक्क नकार पण दिलेला. ७ जुलै १९७७. छे! झेपलंच नाही आपल्याला.

नंतर राहुलच्या प्रेमात पडले खरी पण… त्याचे कसे आहे, त्याची जन्म तारीख जरी ७ असली तरी एकूण सगळ्या तारखेची बेरीज केली तर ती ९ येते, अणि ९ हा माझा lucky number. म्हणूनच आमचं अर्धवेळ पटतं तर अर्धवेळ पटत नसावे बहुतेक. आकड्यांचा दोष अजून काय.
२, ३, ४, ५, ९ हे आकडे मला आवडतात. आता थोडे त्या मागचे logic.

९ - ९ आकडा का आवडतो ह्याचे logic तसे काही नाही. पण मी साधारण ९ आकडा ची गोष्ट घेण्याचा प्रयत्न करते. जसे की मी जास्त पैसे देऊन माझ्या Ray scooter साठी ९ बेरीज होईल असा number चक्क customised करून घेतला. राहुलची निवड पण बेरीज बघूनच केली असणार मी.
बाहेर कामाला जाताना सहज अजू बाजूच्या २-४ वाहनांच्या number plates ची बेरीज होते. ९ बेरीज झालेल्या खूप गाड्या दिसल्या तर आज काम फत्ते होणारच असा आत्मविश्वासा आतून येतो, तेच ७ बेरीज झालेल्या गाड्या जास्त दिसल्या की mood off, मग काय कपाळ काम होणार. ह्यात उगाच माझ्या mood ला दोष देऊ नका, ही काही अंधश्रद्धा नाही, ७ आकडाच नाट आहे. बघा हं! ९ आकडा कसा गोल फिरून बाहेर जातो. म्हणजे तो तुम्हाला अडचणीतून सुखरूप बाहेर काढतो. ह्याउलट, ७ आकडा सरळ काम चालू करून ते आत जाऊन गुंडाळून टाकतो. बघा विचार करा.

२ - आता माझी जन्म तारीख २९ जर धरली तर बेरीज येते २ म्हणून २ आकडा आवडीचा. पण पूर्ण बेरीज होते ६. ह्या आकड्यांशी माझं काही वाकड नाही.

५ - माझी एक numerology शिकलेली मैत्रीण आहे ती म्हणाली की तुझा ५ हा अकडा lucky आहे. तर आता त्या मागचे logic असं की माझा जन्म रात्रीचा, उगवती तारीख २९. पण आपल्या हिंदू शास्त्रा प्रमाणे सूर्योदय च्या आधी असे धरले तर तारीख येते २८. अणि २८ जर धरली तर बेरीज येते १ अणि पूर्ण बेरीज होते ३२ म्हणजे ५.

३ अणि ४ - आता वळूया ३ अणि ४ आकड्यांकडे. तर ते आकडे मला २०१६ पासून खूप आवडायला लागले. त्याचे कारण सांगायला नको.

तर सांगायचा मुद्दा असा की आपलं ७ आकड्यांशी जन्मापासून वाकडेच. इतके की मी जमल्यास ७ आकडा बदलून घेते. Train /bus अणि विमानाची seat मी बदललेली आहे. आता मी दरवेळी बेरीज करत बसत नाही. पण ७ no चीच seat मिळाल्यावर काय करणार, उगाच त्या seat वर बसुन काहीबाई झालं असतं तर. म्हणून train / bus मधे कुणाबरोबर तरी अणि विमानात राहुल बरोबर seat बदलली. राहुलला ७ अणि ९ आकडा आवडणारच. त्याचे ५ अणि २ आकड्यांशी वाकडे असावे. म्हणून तर तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना, असे आहे ना आमचे. 

एकदा Japanese speech competition मधे मला आधी ९ आकडा आला अणि मी final ला qualify झाले. Final ला नेमका no. मिळाला ७, झालं ना, अर्धा confidence खल्लास. पहिले येणार येणार वाटत असताना ७ no शिंकला अणि मला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

आकड्यांचे अणि माणसांचे same असते. काही मानसं आपल्याला जवळची वाटतात, काही शी नुकती ओळख असल्यासारखे नाते असते तर काही ना बघताच क्षणी तिडीक जाते, तसं काहीसे नाते आपले अणि आकड्यांचे असते. हो की नाही ...

Wednesday, May 15, 2024

गोष्ट डोस्याची...

माझं लग्न झालं तेव्हा मला चौघडीच्या पोळ्या सोडल्यास फार काही स्वयंपाक येत नव्हते. घरी ताई असल्याचा तोटा. आईला कधी emergency मधे माहेरी जावे लागले तर kitchen ताईच्या ताब्यात जात असे. माझं नुसतं भात खाऊन पोट भरत नाही, पोळी / भाकरी काहीतरी लागतच, ह्या एकाच कारणा मुळे मी ८ वीत असतानाच पोळ्या करायला शिकले. ह्याउलट राहुल नी १२ नंतर नाशिक सोडले. आधी hostel मग पुण्यात राहत असल्यामुळे आईने राहुलला अणि दादांना दोघांना कॉलेज मधे असतानाच सगळा स्वयंपाक शिकवला होता. फुलके – सगळ्या प्रकारच्या भाज्या, आमटी – भात, इडली-डोस-चटणी-सांबार इत्यादी सगळच दोघांना उत्तम येतं (किंबहुना येत होतं). 

लग्न झाल्या पासून आम्ही दोघेच राहत आहोत. तेव्हा माझ्या चुकलेल्या अनेक भाज्या राहुलने काही टीका ना करता खाल्ल्या आहेत. तेव्हाचा एक किस्सा आठवतो. मी पोळ्या करत होते अणि राहुल लुडबुड करून म्हणाला, “कणीक अजून थोडी मळून घे”. त्याला म्हंटलं, ‘पोळ्या मला करता येतात, त्यात लुडबुड नाही करायची. नाहीतर तुलाच करायला लावीन ह्यापुढे’. अशी धमकी मी का दिली असे अता मला वाटते कारण तो दिवस अणि आजचा दिवस राहुलने त्या नंतर एकदाच पोळ्या केल्या. त्याचे पण एक कारण होते. Pregnant असताना त्या सगळ्या वासाचा मला nausea होता. मग मी बसून सगळ्या पोळ्यांचे आधी त्रिकोन करून घेत असे अणि मग उभ राहून लाटत असे. एकदा असेच त्रिकोन केल्यावर मला मळमळायला लागले अणि मग राहुलला उरलेल्या सगळ्या पोळ्या करायला लागल्या. “ह्या त्रिकोनाचा गोल कसा करतात ते एकदा जरा बसूनच guide कर, पुढे करतो मी” असे म्हणून त्यांनी सगळ्या चौघडीच्या पोळ्या अप्रतिम केल्या. तेव्हा खुपदा राहुलने गरमागरम डोस घालून मला वाढले. तयार करून ठेवलेले डोसे अणि तव्यावरचे पानात पडलेले गरमागरम डोसे ह्यात खूप फरक आहे अणि ते सुद्धा प्रेमानी अणि आयतं मला मिळत होते. हे तर हॉटेल पेक्षा भारी. 

त्या काळात माझे असे खूप लाड झाले किंवा राहुल म्हणतो तसे मी खूप लाड करून घेतले. मग एका मोठ्या (जरा जास्तच मोठ्या) break नंतर आज असे लाड झाले. ह्यावेळी भर होती ती ईशांकची. आम्ही दोघांनी मनसोक्त लाड करून घेतले. छोट्या पंतांनी आगाऊ पणे नाशिकच्या आजीला फोटो पाठवला. आजीचा reply आला, बिच्चारा माझा बच्चा. पंतांनी लगेच audio पाठवला, “बिच्चारा काय बिच्चारा! साधे डोस करता आले नाहीत. तसे छान झाले आहेत पण पहिला डोसा आईनी घालून शिकवल्यावर मग पुढचे छान घातले”. बाबाला न चिडवता खाण्यात काय मजा आहे. (आम्हाला मात्र चिडवलेले अजिबात आवडत नाही. नाकावर राग असतोच). 

आई ही कायम गृहीत धरली जाते. आज बाबा डोसे घालतो आहे म्हंटल्यावर पंतांनी जेवण झाल्यावर थोड्या break नंतर परत २ डोसे खाल्ले. 

ईशांक मुळे परत असे लाड लवकरच होतील अशी आशा आहे (मी ईशांक ला pin मारण्याचा अवकाश). फक्त ह्या वेळी आयता चहा मिळाला तर… (सुख म्हणजे नक्की काय असतं).
२६ / ०४ / २०२४

(PC : राहुल. त्याला माहिती असतं मी असं काही लिहिणार आहे तर कदाचित त्यांनी फोटो काढला नसता. मला स्वतःला माहिती नव्हतं मी असं काही लिहिणार आहे. आज शनिवार असून पंतांना शाळा अणि राहुलला office आहे, म्हणून रिकामटेकड्या आई  / बायको नी लिहिले. तसेही आई (अणि बायको) कुठे काय करतात.

Thursday, April 25, 2024

संस्कार देण्या पेक्षा संस्कार घेणे महत्त्वाचे असते.

मध्यंतरी माझ्या मैत्रिणीचा घरी जाणे झाले. तिचा मुलगा ईशांकच्याच वयाचा तर मुलगी १५-१६ वर्षांची. हे दोघे हॉल मध्ये धिंगाणा घालत होते अणि ती बिचारी दार लोटून बेडरूम मधे अभ्यास करत होती. पंतांना washroom ला जायचे होते. बाहेरच्या washroom ला मैत्रिणीने Do not use असा board अडकवला होता. पंत bedroom च्या बाहेर उभे राहून म्हणाले, “ताई आत येऊ का? मला washroom ला जायचे आहे”. 

ईशांक washroom ला गेला अणि ती पळत बाहेर आली अणि तिने पंतांनी permission मागितल्याचे कौतुकाने तिच्या आई ला सांगितले अणि मला म्हणाली, “मावशी तुझा मुलगा खरच वेगळा आहे. एवढ्या लहान वयात त्याने असे विचारले ते पण खूप politely. I am impressed”. एक आई म्हणून हा आनंद शब्दात मांडता येणारच नाही. 

पंत ३-४ वर्षाचा असताना त्याला मी कधीतरी सांगितले असेन (एकदाच, कधी हे नेमके आठवत नाही) की मुलींच्या खोलीत शिकताना नेहमीच आधी permission घ्यावी. तेव्हा पासून मी एकाटी जरी bedroom मधे काही करत असले तरी तो bedroom च्या बाहेर उभा राहून विचारातो, आई आत येऊ का? दार उघडे असताना सुद्धा, मी जर कपाटाच्या आडोश्याला असले तर तो आधी येऊ का, विचारल्याशिवाय आत येत नाही. त्याला मी दारा बाहेरून दिसले, तरच तो permission न घेता आत येतो. हे इतके रोजचे झाले आहे की तो काही विशेष करतोय असे नाही. पण बाहेर जाऊन खेळण्याच्या नादात सुद्धा तो जेव्हा संस्कार विसरत नाही तेव्हा अभिमान वाटतो.

मला नेहमीच वाटते, प्रतेक आई वडील मुलांना चांगलेच संस्कार देतात. ते घेणे न घेणे हे मात्र त्या त्या मुलांवर अवलंबून असते. मोठा झाल्यावरच पण असाच रहा हेच माझे तुला आशीर्वाद अणि देवाकडे प्रार्थना.



Thursday, March 26, 2015

मी आणि मराठी आकडे...

      खूप वर्ष झाली मी English बरोबरच मराठी ब्लॅक लिहिते आहे. English माध्यामात शिकल्यामुळे मराठी मध्ये ब्लॅक लिहिणे माझ्या साठी अजिबात सोपं नव्हंतं. मी आज English इतकच मराठी वाचते ह्याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं. पण... मी मराठी वाचत असले तरी मला आजही मराठी मध्ये आकडे वाचता येत नाहीत. ते मी आजही English मध्येच वाचंते. उदा. “भारताने One hundred and twenty धावांनी विजय मिळवला”. ह्यात चूक माझी नाही आहे. कसं ते मी सांगते.
आपण देवनागरी अथवा English लिपी ही डावीकडून उजवीकडे अशी लिहितो. मात्र मराठी आकडे वाचताना हा नियम मोडीस निघतो.
उदा. ४५ - पंचेचाळीस
    ५ – उजवीकडचा आकडा मग
    ४ – डावीकडचा आकडा
ह्याला चाळीसपंचे असं का बरं नाही म्हणत?
मी आईला ह्याचं कारण विचारलं असंता आई म्हणाली, “पाच हे चाळीस मध्ये घातलें जातात, म्हणून पंचेचाळीस”
मग – पाच चाळीस मध्ये घालण्या वेजी चाळीस + पाच असं सोपं नाही का?

एकम्‌ - दशम्‌ ह्या क्रमानुसार एकम्‌ आकडा प्रथम वाचून मग दशम् आकडा वाचत असतील अशी मी स्वत:ची समजूत घातली. पण मग शतम् आकडा आला की त्याचा क्रम एकम् - दशम् - शतम् असा होत नाही. आधी शतम् मग एकम् आणि मग शेवटी दशम्. म्हणजे ’आधी डावीकडील आकडा मग एकदम उजवीकडील आकडा आणि शेवटी मधला आकडा’
उदा. ९४५ – नऊशे पंचे चाळीस
     ९ – एकदम डावीकडील आकडा (शतम्)
     ५ – एकदम उजवीकडील आकडा (एकम्) आणि शेवटी
     ४ – मधला आकडा (दशम्)
मग पंचे चाळीस ह्या एकम् दशम् नियमाप्रमाणे एकम् दशम् शतम् असाच क्रम ठेऊन ह्याला
पंचे चाळीस नऊशे असं म्हटलं पाहेजे.

अता अजून एक आकडा वाढवूया. सहस्र
१९४५ ह्याला एक हजार नऊशे पंचे चाळीस अथवा
एकोणीसशे पंचे चाळीस असं म्हणतात.
म्हणजे ह्याचा क्रम सहस्र – शतम् - एकम् - दशम्
दशम् च्या पुढे आकडे गेले की ते डावीकडून उजवीकडे वाचले जातात ते शतम् पर्यंत, शतम् नंतर परत आधी एकम् मग दशम् क्रम येतो.

      तसंच २९,३९,४९,५९,६९,७९,८९,९९ ह्या आकड्यांचं. English मध्ये ह्याला twenty nine, thirty nine, forty nine etc. असं साध सरळ म्हणतात. मराठीत ह्याला एकोणतीस, एकोणचाळीस, एकोणपन्नस इत्यादी म्हंटले जाते. मग सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस ह्या प्रमाणे ह्याला नऊवीस अथवा नव्वावीस का नाही म्हणत? नव्वावीस, नव्वातीस, नव्वाचाळीस असं असायला पाहीजे होतं.
ह्याचं उत्तर असं –
२९ - तीस ला एक ऊणे (कमी) म्हणून एकोणतीस.
३९ – चाळीस ला एक ऊणे म्हणून एकोणचाळीस
मग २८ ला तीस ला दोण ऊणे म्हणून दोणऊणेतीस
    ३८ ला दोनऊणेचाळीस इत्यादी का नाही म्हणत?

      मुंबईत असताना मी ह्या गोष्टीचा एवढा विचार केला नव्हता. पण पुण्यात आल्यापासून मराठी आकड्यांशी जास्त संबंध आल्यामुळे मनात गोंधळ उडाला. ह्याला उपाय म्हणून मी स्वत:चीच अशी एक मराठी आकडे लिहिण्याची शैली शोधून काढली. पुण्यात कुणाला phone no विचारला की ते सांगतात, “नऊशे पंचे चाळीस एक्क्याण्णव त्र्याऐंशी सहाशे पन्नास
मी असं लिहीते –:
नऊशे पंचे चाळीस -
नऊशे – (९ _ _)
पंचे – (९ _ ५)
चाळीस – (९ ४ ५)
एक्क्याण्णव –
एक्क्या (एक) – (_ १)
ण्णव (नऊ) – (९ १)
त्र्याऐंशी –
त्र्या – (_ ३)
ऐंशी – (८ ३)
सहाशे पन्नास –
सहाशे – (६ _ _)
पन्नास – (६ ५ ०)
म्हणजे ९४५९१८३६५०

      अर्थात ह्या माझ्या शोधाचा मीच कमित कमी वापर करते. कारण हे सुद्धा तितकच गोंधळून टाकणारे, तेवढच complicated आहे. मग कुणी नऊशे पंचे चाळीस अशी सुरवात केली की मी लगेच विचारते, “Nine Four Five पुढे...” मग ते एकतर एक-एक मराठी आकडा सांगतात किंबहूना सरळ English मध्ये सांगतात.

      लहान असतानाची एक गोष्ट मला आठवते. माझ्या वडिलांचे एक सिंधी मित्र होते. त्यांनी एकदा phone केला आणि विचारले, “पाचशे पासष्ट अकरा एकोणसत्तर?” मी सरळ Wrong no म्हणून मोकळी झाले. पलिकडून ते म्हणाले, “Five six five double one six nine?” मी म्हंटलं हो! ते म्हणाले अगं मी हेच मराठीतून विचारलें होते.

      मला ह्या बाबतीत राहुलचं कौतुक वाटतं. तो सुद्धा English medium मध्ये शिकला आहे. पण कामाच्या ठिकाणी आणि अता business मध्ये त्याचा वर्कर लोकांशी संबंध येत असतो. त्यांना अजीबात English numbers समजत नाहीत. म्हणून (deliberately) प्रयत्नपूर्वक राहुल मराठी आकडे बोलायला लागला आणि शिकला. आता तो अस्खलीत मराठी मध्ये मोठे आकडे वाचू, लिहू आणि बोलू शकतो. मला तशी गरज कधी भासली नसल्याने, मी मराठी आकडे कधी शिकणार कोण जाणे.

२६-०३-२०१५

Monday, March 11, 2013

अग आई आणि अहो आई. - एक गमतीदार किस्सा...


                           अग आई आणि अहो आई.
-                                                                                                                           -   एक गमतीदार किस्सा...

लग्ना नंतर 'अहो आई' म्हणायची मला स्वत:ला सवयच लावून घायला लागली असं म्हणायला हरकत नाही. 'अहो आई', 'तुम्ही' वगैरे माला बोलायला तसं अजूनही जडच जातं. आई अशी हाक मारताना 'ए आई sss', 'ए आई ग sss', 'अग आई ग sss' असच हक्काने तोंडी येतं. हक्क! खरच आपल्या आईवर आपला केवढा हक्क असतो. घरात सगळ्यांनीच  ‌‌‌गृहीत धरलेली व्यक्ती म्हणजे आई. 

माझी 'अग आई' नोकरी करत असल्या मुळे मला आणि ताईला कामाची अगदीच सवय नव्हती असं नाही. आयत ताट हातात मिळत नसलं, तरी सगळा स्वयंपाक करायला, अथवा घरचं काही संपलं आहे/नाही हे  कधी बघायला लागलं नाही हे नक्की. लग्ना नंतर एकदम सगळ अंगावर पडल्यावर मात्र माझी सुरवातीला तारांबळ उडायची. राहुलला मात्र एकटं रहायची सवय असल्यामुळे, रात्री कामावरून येताना दूध आणणे इत्यादी गोष्टी त्याच्याच लक्षात असायच्या. मला मात्र फोडणी करताना आयत्या वेळी लक्षात यायचं की घरी मोहरी संतली आहे. अर्थात राहुलने कधीच त्या वरून माला टोमणे मारले नाहीत. मी आणि राहुल असे दोघेच राहत असल्या मुळे आम्हाला काहीही backup नव्हता. पण कदाचीत त्यामुळेच चुका झाल्या तरी फार काही वाटायचं देखील नाही. कारण जेवणारे आम्ही दोघचं. उकडलेल्या बटाट्याची भाजी, काचऱ्याच्या भाजी सारखी तीखट घालून पण मी बनवली आहे. कारण त्या दिवशी घरी मोहरी होती, पण मिरच्याच संपल्या होत्या. असेच चुकत चुकत मी शिकत होते. ह्या सगळ्यात भर म्हणून की काय, घरी अजून कामवाली बाई मिळाली नव्हती. त्यामुळे, स्वयंपाक करणे, काय संपलं आहे/नाही हे बघणे, भांडी घासणे, केर-लादी हे सगळं आम्ही दोघं मिळून करत असू.

तर असं सगळं सुरळीत? चालू असतानाचं लग्ना नंतर साधारण २ महिन्यानी आमच्या अहो आई, म्हणजेच माझा सासूबाई आणि सासरे आमच्याकडे रहावयास आले. तो पर्यंत कामाची तशी सवय लागायला लागली होती. तरी कधीतरी गडबड ती व्हायचीच. त्यात सासूबाई पहिल्यांदाच रहावयास आल्या कारणाने त्यांच्यावर impression मारणं आलंच J J. मी जिद्दीने आणि प्रेमाने सगळं केलं देखील. आणि ते सुद्धा न चुकता. त्यांना काही म्हणजे काही करायला अथवा बघायला लागलं नाही हे विशेष. मला स्वत:लाच समाधान वाटलं. त्यांना पण आराम वाटला.

त्या नंतर काही दिवसानी माझी अग आई, नाना, ताई, जिजू आणि अहना असे सगळे अमच्याकडे आले. मी अहनाच्या आवडीचा बटाट्यांच्या परोठ्यांचा बेत आखला होता. इतर सगळ आई, नाना येईपरीयंत मी तयार करून ठेवलं होतं. परोठे तेवढे करायचे बाकी होते. आई लगेच म्हणाली, "तू सगळं केलं आहेस, आता परोठे मी करते". मी लगेच म्हणाले, "बर चालेल". असचं राहुलची आई, म्हणजेच माझ्या आहो आई पण म्हणायच्या. तेव्हा मी त्यांना म्हणायचे, "नाही, नको! मी करीन. तुम्ही आराम करा... वगैरे वगैरे".

हे माझ्याकडून इतक्या सहजतेने घडलं की मी असा फरक केलेला माझा लक्षात देखील आला नाही. राहुलने माला जेव्हा सांगीतलं तेव्हा माझा हे लक्षात आलं. तो म्हणाला, "कसली हरामखोर आहेस! सासू ला म्हणते मी करते, मी करते. आणि आईला कामला लावतेस". खंरच! आता तसं बघता आई आणि माझ्या सासूबाई एकाच वयाच्या. पण मी आईला गृहीत धरले. किती सहजतेने अथवा अनवधानाने असा फरक आपल्या हातून घडून जातो ह्याची मला गंमत वाटते. हे मी माझा अग आईला सांगीतल्यावर ती म्हणाली, “असच असतं! तुझ्या सासूबाई कधीतरीच तुमच्या कडे येणार, तेव्हा तू त्यांना काम करायला का सांगणार आहेस”. माला पटलं. पण मग माझी आई देखील कधीतरीच तर येते माझ्या कडे?

मला हसू आले आणि गंमत देखील वाटली. कदाचित आईला असं गृहीत धरलेलंच आवडत असेल. अथवा मी मुलगी म्हणून आईला असं ग्रुहीत धरण्याचा माझा हक्कचं आहे!

Sunday, July 01, 2012

राणीसाहेब...


आज राणीसाहेबांचा काही वेगळाच थाट होता. सकाळी त्यांनी आपल्या अलिशान पलंगावरूनच डोळे
किलकिले करून घरात चालू असलेल्या धावपळीचा अंदाज घेतला. तसं त्यांच घरात अगदी बारीक
लक्ष असे. कागदाचा छोटासा कपटा सुद्धा त्यांच्या दृष्टीस पडला की त्या अस्वस्थ होत असत. मग
कधी तो स्वत: उचलून त्याची विेल्हेवाट लावत असत. नाहीतर इतरांना करायला लावत असतं. आज मात्र त्यां कागदाच्या कपट्याचा त्यांना त्रास होत नव्हता. आज त्यांना कसलाच त्रास होत नव्हता.

आपल्या पलंगावरूनच आज त्या सगळ्या घाराचा कारभार बघत होत्या. घरातल्या इतर व्याक्तिंच्या 
धावपळीकडे मात्र त्या चोख लक्ष ठेवून होत्या. आज जेवायला आपल्याला काय हव, कय नको ह्याची 
यादी त्यांनी जवळपास सगळ्यांनाच पडल्या पडल्या सांगितली. राणीसरकारांची जेवणाची फ़्रर्माईश 
आज काही वेगळीच होती. राणीसाहेबांचा हुकूम ऎकून घरातील लोकांची अगदी धावपळच उडाली. 
सगळे तयारीला लागले.

आजचा दिवस खरच राणीसरकारांसाठी कहितरी वेगळा होता. सकाळी लवकर उठून अंघोळ करुन तयार होणाऱ्या राणीसरकार १०.०० वाजून गेले तरी उठण्याचे नाव घेत नव्हत्या. त्यांच्या तब्बेतीची चिंता जरा घरच्यांना लागली. पण आजरी असल्याची काहिच चिन्ह नव्हती. मग आज राणीसरकारांना झालय तरी कय? हा प्रश्न घरातीन सगळ्याच मंडळींना सतावत होता. पण राणीसरकारांना आज त्याची पर्वा नव्हती.

सकाळी उठल्या पसून बडबड करून सगळ्यांना कामाला लावणाऱ्या राणीसरकार आज मात्र कुणाशीच 
कहिही बोलत नव्हत्या. घारातील मंडळी आपल्या पलंगाजवळ येऊन मुद्दाम आपल्याशी कहीतरी 
बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्या ओळखून होत्यी. आज त्यांच कुठे आणि काय विनसलं हेच 
कुणाला समजत नव्हत. कुणी बोलायला येत आहे हे पाहून त्या सरळ कुस बदलून परत झोपल्याचं 
नाटक करत होत्या.

पडल्या पडल्या त्या इतर लोकांची धावपळ मात्र बघत होत्या. घरच्यांच्या सगळ्यांच्या अंघोळी झाल्या 
तरी त्या अजून झोपूनच होत्या. आज त्यांना स्वत:च आवरण्याची कसलीच घाई दिसत नव्हती. 
घरातील वळदळीकडे त्यांचं लक्ष जरी असलं तरी आज अपणहून त्यांनी कुणाची चैकशी सुद्धा साधी 
केली नाही. साफ सफाई करण्यासाठी येणाऱ्या मावशींन पासून ते शेजार पाजरच्या बायकांची त्या 
आपणहून चौकशी करत असतं. आज त्यांची अपुलकीने चौकशी करण्यासाठी सुद्धा राणीसरकारांनी 
आपला पलंग सोडला नाही. सगळ्यांनाच चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. आज राणीसरकांनी 
जवळ जवळ सगळ्यांशी अबोलाच धरला होता म्हणा नं.

एरवी लवकर उठून आंघोळ करून त्या देवाचं म्हणायला बसत असत. देवाला धूप दाखवून त्या 
घंटानाद जेव्हा करतात, तेव्हा सगळ घर प्रसन्न होतं. आज देवाला पण चुकल्या चुकल्या सारख 
वाटत असणार हे नक्की. 

स्वयंपाघरात तर त्या जातिने लक्ष घालत असतं. आज कुठली भाजी शिजते आहे, पोळ्या कशा होत
आहेत, हे त्या अगदी जातिने बघत असत. आज मत्र काहितरी वेगळच घडत होतं. जणू आज 
सगळ्याच कामकाजला सुट्टी होती त्यांच्या.

हो खरच! आज खरच सुट्टीचा दिवर होता. आमच्या राणीसरकारांचा नव्हे, राणिसरकारांच्या आईचा. 
आज राणीसरकारांच्या आईचा ‘Weekend’ होता आणि म्हणून राणीसरकार पण खूश होत्या. आज 
त्यांना आईने लवकर उठून अवरण्याची कसलिच घाई केलेली नव्हती. आईने आज लवकर उठवले 
नाही म्हणजे आज आई घरी आहे हे अमच्या राणीसरकारांनी, म्हणजेच माझ्या २ वर्षाय भाची 
अहनाने चांगलच ओळखलं होतं. एरवी ७.३० - ८.०० ला उठणारी अहना, आईच्या weekend च्या 
दिवशी हमखास लवकर उठत असे आणि आईला उठवून म्हणत असे, “आई उठ! अहनाची सकाळ 
झाली.”

एरवी सगळीकडे तुरूतुरू पळून, आंगापक्षा मोठा झाडू घेउन आख्ख घर झाडून काढणाऱ्या अहनाने 
आज सगळ्याला सुट्टी दिली होती. सकाळ पसून राणीसरकारांनी काही खालं नाही, ह्याने 
राणीसरकारांची आईच जस्त अस्वथ झाली होती. “आज मनीमाऊने सांगितल्या प्रमाणे छान
बटाट्याची भाजी केली आहे. मग अहना आज छान भाजी पोळी खाणार का?” ह्या प्रश्नाने मात्र
राणीसरकारांचा अबोला तुटला. “अहनाला दु-दु हव” अशी फर्माईश त्यांनी दिली. “ बरं! मग अहना
आज कपानी दुध पिणार आहे का? आई सारखी.” ह्या आईच्या बोलण्याला मात्रा राणीसरकाराने जरा घुश्यातच उत्तर दिलें, “अहनाची बाटली काऊने नेली. काऊ दादा अहनाची बटली दे. असं काय करतोस?” अस म्हणून तोंडात बोट घालून, कुस बदलून त्या परत लोळत पडल्या. 




Thursday, September 22, 2011

आईच्या स्वप्नात आला अमिताभ बच्चन...

हो! हे खरं आहे. अगदी १०० टक्के खरं. काल आईच्या स्वप्नात चक्क अमिताभ बच्चनजी आलेले म्हणे. आणि आईला चक्क ते स्वप्ना आठवत आहे. आमच्या कडे मुळात बॉलीवूड चं वेड कुणालाच नाही. मी स्वतः शेवटचा पिक्चर कोणता आणि कधी बघितला हे पण मला आठवत नाही. अमुक एक पिक्चर चांगला आहे असं समजल्यावर मी ठरवते की किमान तो पिक्चर तरी multiplex मध्ये जाऊन बघायचाच. पण मी तो पिक्चर बघायला जाण्याचा मुहूर्त निघण्या आधीच तो पिक्चर multiplex च्या बाहेर गेलेला असतो. सांगायचं तात्पर्य असं की माझी अशी स्थिती तर माझी आई movies, cinema, बॉलीवूड, हॉलिवूड, ह्या बाबतीत किती अरसिक असेल ह्याचा अंदाज तुम्हाला येईल. आईला आवडतात ती ' जूनी गाणी'. लता मंगेशकर, आशा भोसले, मन्नाडे, रफी, किशोर कुमार ह्यांची गाणी आम्ही कितीही वेळा एकू शकतो. पण कुणा एका hero बद्दल ची craze नाही. आई ला तर त्याहून नाही. असं असताना, आईच्या स्वप्नात अमिताभजी यावेत हे महा आचर्याची गोष्ट आहे. अमिताभ बच्चन, अमीर खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, कत्रिना कैफ, ऐश्वर्या राय इत्यादी मंडळींची एकदा तरी भेट होऊदे, अगदी प्रतेक्ष नाही तरी किमान ते स्वप्नात तरी दिसुदेत अशी कित्ती लोकांची अपेक्षा असते. आणि अशी मंडळी माझा आईचा स्वप्नात आली तर काय होतं वाचा........

आमच्या घरी कसलस तरी function होता आणि त्या function साठी अमिताभजी आले होता. अर्थात आमच्या घरी अमिताभजी आले आहेत हि गोष्ट ऐश्वर्या pregnant आहे ह्या NEWS इतकीच काही क्षणात सगळीकडे हा हा म्हणता पसरली. आणि हा हा म्हणता आमच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली. आईने वैतागून मग अमिताभजी ह्यांना आमच्या आतल्या खोलीत लपवून ठेवलं. आणि अमिताभजी ह्यांच्या fans ला सांगितलं,"अमिताभ आजकाल असा लोकांकडे येत जात नाही फारसं. तो आला कि खूप गर्दी होते न... कधीतरी अचानक येऊन जातात तो , म्हणजे कुणाला समजत नाही". असं सांगून आईने त्या येणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. बिच्चारे.

आईच्या त्या स्वप्नात fans पेक्षा बिच्चारी अवस्था होती ती अमिताभजी ह्यांची. कारण असं लपून बसून कंटाळा आल्याने त्यांनी मग आमच्या सगळ्यांसाठी मस्त पेकी चहा बनवला. आता एवढ्या मोठ्या कलाकाराने आमच्या साठी चहा बनविलेल बघून आईने सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. आई काय खाऊ घालणार होती हे तिला आठवत नाही. पण कसं आहे... आम्ही सगळे, म्हणजे मी, आई, बाबा, ताई सगळ्यांची उंची बेताचीच. आईला तर कधी कधी ह्या कमी उंची चा भयानक त्रास होतो. म्हणजे हेच बघा. आपण 'न लागणाऱ्या वस्तू’ कपाटाच्या अगदी वरच्या कप्यात ठेवतो. छानसा dinner set असो वा सतत न लागणारी वस्तू असो त्या जपून वरच्या कप्यात ठेवल्या जातात. आता अमिताभजी चक्क आले आहेत म्हंटल्यावर आईला कदाचित त्यांच्या साठी 'तो' छानसा नवा (नवा = न वापरलेला १०~१५ वर्ष जूना) dinner set काढायचा असेल. आता एवढ्या वरती तो जपून ठेवलेला dinner set काढायचा म्हणजे आईला शिडीवर अथवा खुर्चीवर चढणं आलेच. आईने मग चक्क अमिताभ जी ह्यांना हाक मारली व म्हणाली, "उंची मुळे केवढा फायदा होतो हो तुम्हाला, मला जरा तो वरचा डब्बा आणि तो छानसा dinner set काढून द्या." आईनी हे सांगितल्या वर मात्र मी खो खो हसायला लागले आणि मनात आलं, "कुणाला कश्याचं काय तर कुणाला कश्याचं काय".

Monday, September 12, 2011

गणपती विसर्जन - पुणे मुंबई मधील तफावत....

मी एक अस्सल मुंबईकर. माझा जन्म, शिक्षण सगळं मुंबई मधेच झालेलं. सध्या काही वर्ष मी पुण्यात स्थाईक झाले आहे. असं म्हणतात कि मुंबई चा माणूस पुण्यात adjust होऊ शकत नाही. त्याला fast life ची इतकी सवय झालेली असते की पुण्यातली शांतता त्याला खायला उठते. हे थोड्याफार प्रमाणात खरं असेलहि पण पुण्याची भुरळ एकदा पडली की पुणेकर होण्यातली मजा त्याला समजते. मुंबईत पाऊस म्हटलं की अंगावर काटा येतो तसच पुण्यात प्रवास म्हंटला की तो नकोसा होतो. मुंबईत सुविधांना पुण्याचा सुंदर वातावरणाची तोड जरी नसली तरी मुंबईचा समुद्राचा अभाव पुण्याला जाणवतो. थोडक्यात काय तर दोन्ही मध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. काहीतरी वाटत पुण्याची थंड हवा मुंबई ला export करावी आणि मुंबईची transportation facility पुण्यात आणावी. अर्थात हे स्वप्न आहे. फक्त स्वप्न. असो

मला अनेक जण विचारतात, "पुणे छान की मुंबई"? मुंबईत शिस्त आहे तर पुण्यात एक सुंदर इतिहास आहे. . पुण्यात मराठमोळ वातावरण आहे तर मुंबईत cosmopolitan ची विविधता आहे. आपापल्या परीने दोन्ही आपापल्या जागी छान आहेत.

एक मोठ्ठा फरक मला कोठे जाणवला असेल तर तो गणपती विसर्जनात. बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ साली पुण्यात "केसरीवाडा" सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करून खर्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केले. गणेश उत्सव खरतर महाराष्ट्रा मधे जास्त करून साजरा केला जाणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पुण्यात त्या मुलेच की काय खर्या अर्थाने गणेश उत्सव साजरा केला जातो असं मला वाटत. मी आज मुंबईचे गणपती उत्सव आणि पुण्यातील गणेश उत्सव दोन्ही जवळून पहिले आहेत आणि म्हणून मी आज ठाम पणे हे सांगू शकते की पुण्यात अजूनही साजेसा गणेश उत्सव साजरा केला जातो. पुण्यातल्या काही गणेश मंडळांना 'धिंगाण्या' चे स्वरूप जरी आले असले तरी अजून मनाचे ५ गणपती अजूनही आपली शान आणि शिस्त सखून आहेत.


मुंबईत कोणताही कार्य असो अख्खी मुंबई 'बॉलीवूड' च्या तलावात थिरकते. गणपती विसर्जनाचा पण तेच आहे. त्या विसर्जनाला न लय असतो न ताल. असतो तो नुसता धिंगाणा. एक हात वरती उचलायचा आणि कोणत्यातरी बॉलीवूड च्या गाण्यावर एक एक पाय उचलायचा की झाला dance. मग आपण गणपतीला कोणती गाणी वाजवत आहोत ह्याचा काहीही भान नाही. शीला की जवानी पासून ते मुन्नी अश्या गाण्यावर मुंबईत गणेश विसर्जन होते. लालबाग च्या राजाचा थाट मुंबईत जरी मोठ्ठा असला तरी विसर्जनाची अवस्था तीच. मधूनच मग कोठेतरी मराठमोळी फुगडी घालताना काही बायका व मुली नजरेस पडतात पण एक - दोन फुगड्या झाल्या की परत एक हाताचा dance चालू होतो. मुंबईला एकाच धोरण माहिती आहे, "पैसा फेक, तमाशा देख". मग कोणताही सण असो लाखा लाखांचे फटके उडवायचे, तेवढ्याच किमतीचा गुलाल उधळायचा आणि एक हात वर करून चित्र विचित्र नाचायचे.

ह्या उलट चित्र बघायला मिळत ते पुण्यात. ढोल - ताश्या च्या गजरात गणरायाचं विसर्जन होतं. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी कधी नव्हे ते पुणेकर शिस्ती च पालन करताना मी ह्या ची डोळा ह्याची देही पहिले आहे. गणपती विसर्जनाच्या ढोल पथकाची तालीम एक दीड महिना आधी पासून चालू होते. तालीम करताना ढोलाचे स्वर कानावर पडतात आणि जणू काही ते स्वर गणरायाच्या आगमनाची वरात घेऊन येतात असं वाटते. त्या ढोल ताश्या च पथकाच्या तालामिनेच वातावरण प्रफुल्लीत होऊन जाते.Ganesh Visarjan - Pune

पुण्याचे ठरलेले ५ मानाच्या गणपतीचे आधी विअर्जन होते. ही पद्धत फार पूर्वी पासून ते आजतागायत चालू आहे. पहिला निघतो तो 'कसबागणपती' -श्री विनायक ठाकर ह्यांचा घराजवळ ही गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी तेथेच त्याची स्थापना केली. पुण्याचा ग्रामदेवता म्हणून ह्या गणपतीचा मन मोठा आहे.

दुसरा मानाचा गणपती म्हणजे 'तांबडी जोगेश्वरी'. आफ्रिकेतल्या हत्ती सारखी दिसणाऱ्या ह्या मूर्तीची मिरवणूक नेहमी चांदीचापालखीतून निघते.

तिसरा मन आहे 'गुरुजी तालीम' गणेश मंडळाचा. ह्याची स्थापना १८८७ रोजी झाली. हिंदू-मुसलमान ह्यांच्या एकी साठी ह्यागणपतीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

चौथा मन आहे 'तुळशीबाग' ह्या गणपतीचा. श्री. खटावकर ह्यांचा हस्ते दर वर्षी ह्या तुळशीबागेलाल्या गणरायाची स्थापना केलीजाते. ह्याचा वैशिठ म्हणजे दरवर्षी ही मूर्ती fiber glass पासून बनवली जाते.

पाचवा मानाचा गणपती म्हणजे 'केसरीवाडा'. ह्या गणपती पासूनच बालगंगाधर टिळक ह्यांनी १८९३ रोजी सार्वजनिकगणेशउत्सव ची स्थापना केली. पुण्यात ह्या मानाचा गणपतींचे विसर्जन आधी होते आणि मगच इतर गणेश मंडळ आपल्या मूर्तींचे विसर्जन करतात.

ह्या ५ मानाचा गणपतींची विसर्जन मिरवणूक बघण्या सारखी असते. रस्त्याचा दोन्ही बाजूला रांगोळी काढल्या जातात. पहिला मानाचा गणपती 'कसबा गणपती' ची मिरवणूक सर्वात पहिले निघून त्याचाच साधारण स. ४ ला विसर्जन होते.

ह्या सगळ्या मानाच्या गणपतीचा विसर्जन ढोल - ताश्याच्या गजरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घडते. कोठेही गोंधळ नाही,गडबड नाही. कोठेही देवाचा नलाखाली धिंगाणा नाही. "गणपती माप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" असे गात एक सुंदर अश्या लयबद्ध तालात ह्या गणपतींचे विसर्जन होते.

पुण्यातील ह्या मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन झाले की मात्र मुंबई सारखा धिंगाणा येथे पण चालू होती. मग बॉलीवूडच्या गाण्यावर येथल्या पण लोकांचे पाय थरारतात. एवढ्या उत्कृष्ट ढोल - ताश्याच्या तालानंतर ही गाणी एकूण गणपती बाप्पा सुद्धा आपले सुपेवढे कान बंद करून घेत असेल हे नक्की.