Saturday, March 08, 2025

जुने ते सोने – पारंपरिक भांड्यांकडे परत एक पाऊल

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सोय आणि वेग याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच स्वयंपाकघरात non-stick आणि aluminium भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण काही गोष्टी सोयीसाठी घेतल्या तरी त्याचे दुष्परिणाम लक्षात घ्यायला हवेत. मला हे जाणवलं आणि शेवटी मी ठरवलं – पारंपरिक भांड्यांकडे परत वळायचं!
मी नुकताच माझ्या स्वयंपाकघरातील non-stick तवे, aluminium कढया माळ्यावर टाकून दिल्या आणि त्याऐवजी लोखंडाच्या भांड्यांचा वापर सुरू केला. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण जसजसा वापर वाढला, तसतसे त्याचे फायदेही समजू लागले.

परंपरागत काही सवयी आपण आत्मसात करतो, त्यातली मी एक आत्मसात केलेली गोष्ट म्हणजे आमटीला फोडणी केली की ती पळी आमटी मध्ये ठेऊन थोडावेळ आमटीला उकळी येऊन देणे. पोटात natural form मधले लोखंड जावं हा त्या मागचा उद्देश. पण मग शिरा, उपमा, पुर्या करायला aluminium कढई किवा non-stick, भाजी साठी non-stick कढई / pressure pan, पोळ्या भाजण्यासाठी परत non-stick तवा असे चालू होते. भाकरी मात्र लोखंडाच्या ताव्यावर. खूप दिवस मानला हे खटकत होतेच, शेवटी मी अणि ताई दोघांनी जाऊन लोखंडाच्या सामानाची खरेदी केली.

लोखंडी भांडी वापरायला लागण्या आधीची तयारी - 
लोखंडी भांडी बाजारातून आणली अणि एकदा धुऊन वापरायला घेतली असे करून चालत नाही. एकदा धुऊन, पुसून, त्याला सगळीकडून आधी तेल लाऊन (गोड किंवा खोबरेल) ती अर्थ तास तशीच ठेवायची. मग एका स्वच्छ फडक्याने ती पुसून घेऊन मग परत स्वच्छ धुवून मग ती वापरण्यासाठी तयार होतात. असे न केल्यास पदार्थ काळे पडतात. मी ही भांडी वापरायला सुरवात केल्यावर १-२ दिवस जरा त्रास झाला. रात्रीचा स्वयंपाक अणि मुलाचा अभ्यास असा एकत्र चालतो, अणि ‘नजर हटी दुर्घटना घटी’ म्हणतात तसेच जरा मुलाच्या अभ्यासात डोके घातले अणि भाजी जाऊन खाली चिकटली. ‘पीठ पेरून केलेल्या भाज्या जरा खरपूसच चांगल्या लागतात’ म्हणत मी दोघांना काही बोलूच दिले नाही. पण त्या चिकटलेल्या भाजीला लोखंडी कढई काही सोडवेना. मग शेवटी तिला भिजत घालून, मग उकळी काढून तिला साफ केले.

अजून एक कटकटीचे काम म्हणजे लोखंडाच्या वस्तू लगेच धुऊन, पुसून ठेवायला लागतात. त्याला एक पर्याय मी काढला आहे. मी ती भांडी साबणाच्या पाण्यात भिजत घालून ठेवते. आमच्या मावशी त्या धुतात अणि लगेच पुसून मग उपड्या घालतात. अशी लगेच पुसून ठेवायला तयार असलेली मावशी मिळाली तर non-stick ला replace करून लोखंडी भांडी वापरायला हरकत नाही.

पुढचा टप्पा – पितळी भांडी
लोखंडी भांडी वापरायला सुरुवात केली तशीच हळूहळू पितळी भांडी घेण्याचीही इच्छा आहे. तांब्याचा पिंप आणि चांदीचा पेला घरी आहेच, पण स्टीलच्या ताट-वाट्यांच्या जागी पितळ घ्यावे असं वाटतंय.
त्या नंतर घरातील plastic storage containers बदलून त्या जागी पितळी डब्बे घेण्याचा पण विचार आहे. ह्या साठी वेळ लागेल. पण पितळी भांड्यांचं आकर्षण काही वेगळंच – looks आणि utility दोन्ही!

“Non-stick ” पासून “sustainable” कडे प्रवास -
Non-stickचा पर्याय तात्पुरती सोय देतो, पण आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी टिकाऊ पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. लोखंड, तांबे, पितळ यासारखी पारंपरिक भांडी वापरणे म्हणजे केवळ जुन्या पद्धतीकडे परत जाणे नाही, तर ते एक sustainable आणि आरोग्यदायी पाऊल आहे.

तुम्हीही हा बदल करू शकता! जर तुम्हीही non-stick आणि aluminium पासून मुक्त होण्याचा विचार करत असाल, तर सुरुवात लोखंडी कढईपासून करा. थोडा वेळ लागेल, थोडं चिकटेल, पण हळूहळू सवय लागेल आणि तुम्हाला याचा खूप फायदा जाणवेल.

बाजारात तेच विकते जे खपते. पितळ अणि तांब्याचा वापर वाढला तर कल्हई वाले पण कोपर्‍या कोपर्‍यात दिसतीलच.

“जुने ते सोने” ही फक्त म्हण नाही, तर ती आरोग्यासाठीची उत्तम निवड आहे!
---‐--------------------०--------------०-------------------------
Photo from google.

No comments: