Wednesday, May 15, 2024

गोष्ट डोस्याची...

माझं लग्न झालं तेव्हा मला चौघडीच्या पोळ्या सोडल्यास फार काही स्वयंपाक येत नव्हते. घरी ताई असल्याचा तोटा. आईला कधी emergency मधे माहेरी जावे लागले तर kitchen ताईच्या ताब्यात जात असे. माझं नुसतं भात खाऊन पोट भरत नाही, पोळी / भाकरी काहीतरी लागतच, ह्या एकाच कारणा मुळे मी ८ वीत असतानाच पोळ्या करायला शिकले. ह्याउलट राहुल नी १२ नंतर नाशिक सोडले. आधी hostel मग पुण्यात राहत असल्यामुळे आईने राहुलला अणि दादांना दोघांना कॉलेज मधे असतानाच सगळा स्वयंपाक शिकवला होता. फुलके – सगळ्या प्रकारच्या भाज्या, आमटी – भात, इडली-डोस-चटणी-सांबार इत्यादी सगळच दोघांना उत्तम येतं (किंबहुना येत होतं). 

लग्न झाल्या पासून आम्ही दोघेच राहत आहोत. तेव्हा माझ्या चुकलेल्या अनेक भाज्या राहुलने काही टीका ना करता खाल्ल्या आहेत. तेव्हाचा एक किस्सा आठवतो. मी पोळ्या करत होते अणि राहुल लुडबुड करून म्हणाला, “कणीक अजून थोडी मळून घे”. त्याला म्हंटलं, ‘पोळ्या मला करता येतात, त्यात लुडबुड नाही करायची. नाहीतर तुलाच करायला लावीन ह्यापुढे’. अशी धमकी मी का दिली असे अता मला वाटते कारण तो दिवस अणि आजचा दिवस राहुलने त्या नंतर एकदाच पोळ्या केल्या. त्याचे पण एक कारण होते. Pregnant असताना त्या सगळ्या वासाचा मला nausea होता. मग मी बसून सगळ्या पोळ्यांचे आधी त्रिकोन करून घेत असे अणि मग उभ राहून लाटत असे. एकदा असेच त्रिकोन केल्यावर मला मळमळायला लागले अणि मग राहुलला उरलेल्या सगळ्या पोळ्या करायला लागल्या. “ह्या त्रिकोनाचा गोल कसा करतात ते एकदा जरा बसूनच guide कर, पुढे करतो मी” असे म्हणून त्यांनी सगळ्या चौघडीच्या पोळ्या अप्रतिम केल्या. तेव्हा खुपदा राहुलने गरमागरम डोस घालून मला वाढले. तयार करून ठेवलेले डोसे अणि तव्यावरचे पानात पडलेले गरमागरम डोसे ह्यात खूप फरक आहे अणि ते सुद्धा प्रेमानी अणि आयतं मला मिळत होते. हे तर हॉटेल पेक्षा भारी. 

त्या काळात माझे असे खूप लाड झाले किंवा राहुल म्हणतो तसे मी खूप लाड करून घेतले. मग एका मोठ्या (जरा जास्तच मोठ्या) break नंतर आज असे लाड झाले. ह्यावेळी भर होती ती ईशांकची. आम्ही दोघांनी मनसोक्त लाड करून घेतले. छोट्या पंतांनी आगाऊ पणे नाशिकच्या आजीला फोटो पाठवला. आजीचा reply आला, बिच्चारा माझा बच्चा. पंतांनी लगेच audio पाठवला, “बिच्चारा काय बिच्चारा! साधे डोस करता आले नाहीत. तसे छान झाले आहेत पण पहिला डोसा आईनी घालून शिकवल्यावर मग पुढचे छान घातले”. बाबाला न चिडवता खाण्यात काय मजा आहे. (आम्हाला मात्र चिडवलेले अजिबात आवडत नाही. नाकावर राग असतोच). 

आई ही कायम गृहीत धरली जाते. आज बाबा डोसे घालतो आहे म्हंटल्यावर पंतांनी जेवण झाल्यावर थोड्या break नंतर परत २ डोसे खाल्ले. 

ईशांक मुळे परत असे लाड लवकरच होतील अशी आशा आहे (मी ईशांक ला pin मारण्याचा अवकाश). फक्त ह्या वेळी आयता चहा मिळाला तर… (सुख म्हणजे नक्की काय असतं).
२६ / ०४ / २०२४

(PC : राहुल. त्याला माहिती असतं मी असं काही लिहिणार आहे तर कदाचित त्यांनी फोटो काढला नसता. मला स्वतःला माहिती नव्हतं मी असं काही लिहिणार आहे. आज शनिवार असून पंतांना शाळा अणि राहुलला office आहे, म्हणून रिकामटेकड्या आई  / बायको नी लिहिले. तसेही आई (अणि बायको) कुठे काय करतात.

No comments: